बिडकीन, (प्रतिनिधी) परिसरात दिवसभरात चार ठिकाणी अपघात घडले. त्यापैकी दोन अपघातांत दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, चार जण गंभीर झाले आहेत. पहिल्या अपघातात छाया जनार्धन कोथिंबिरे तर दुसऱ्या अपघातात सिद्धू ऊर्फ शंतनू आहुजा काळे (१७, रा. नांदलगाव, ता. पैठण) यांचा मृत्यू झाला.
पहिला अपघात पैठण बिडकीन मार्गावरील हॉटेल पार्वतीसमोर सायंकाळी सुमारे ५ वाजेदरम्यान घडला. एका भरधाव रिक्षाने समोरून येणाऱ्या वाहनाला चुकवण्याच्या प्रयत्नात अचानक वळण घेतल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि रिक्षा पलटी झाला. या अपघातात रिक्षातील प्रवासी गंभीर जखमी झाले. यामध्ये छाया जनार्धन कोथिंबिरे यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दूसरी घटना रात्री साडआठ वाजेच्या सुमारास सोमपुरी तें बिडकीन मार्गावरील मोतीनगर येथे घडली. दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
-- सलग अपघातांची मालिका --
दोन निष्पाप जीवांचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्याने बिडकीन परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेफिकीर वाहनचालक, वेगावर नियंत्रणाचा अभाव आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अशा दुर्घटना घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना करून अशा अपघातांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या अपघातात सिद्ध ऊर्फ शंतनू आहुजा काळे (१७, रा. नांदलगाव, ता. पैठण) याला गंभीर अवस्थेत ग्रामीण रुग्णालय बिडकीन येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. तर सुरेश शिंदे आणि स्वाती शिंदे (दोघेही रा. कल्याणनगर, बिडकीन) हे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, याच दिवशी इतर दोन किरकोळ अपघातही घडले. मात्र संबंधितांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसून, वाहनांची दुरुस्ती करून ते निघून गेले असल्याची माहिती समोर आली आहे.












